विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन
सिल्लोड, (प्रतिनिधी) लोकसेवा हमदर्द चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत संचालित नॅशनल इंग्लिश स्कूल अजंता येथे गुरुवारी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक तसेच स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात योग्य दिशा मिळावी, या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन मेडिकोज थर्टी यांच्या वतीने करण्यात आले होते. हा कार्यक्रम अबुजर खान यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच हमदर्द चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष इकबाल अहमद यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी मेडिकोज थर्टीचे व्यवस्थापक मुश्ताक अहमद सिद्दीकी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
मार्गदर्शन करताना मुश्ताक अहमद सिद्दीकी यांनी दहावीनंतर उपलब्ध असलेल्या विविध शैक्षणिक पर्यायांची सविस्तर माहिती दिली. विज्ञान, वाणिज्य आणि कला या शाखांमधील करिअर संधी, विविध स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी, वेळेचे नियोजन कसे असावे तसेच ध्येय निश्चितीचे महत्त्व यावर त्यांनी सखोल प्रकाश टाकला. आत्मविश्वासाने पुढे जाणे, सातत्यपूर्ण अभ्यास आणि शिस्तबद्ध जीवनशैली यामुळेच यश साध्य होते, असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी करिअरविषयक अनेक शंका उपस्थित केल्या. वक्त्यांनी या शंकांचे निरसन सोप्या आणि व्यवहार्य उदाहरणांद्वारे केले. योग्य मार्गदर्शन, सातत्यपूर्ण परिश्रम आणि शिस्त यांच्या जोरावर कोणतेही ध्येय साध्य करता येते, असा प्रेरणादायी संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला. या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक शेख अमीर हमजा, शेख गुलाम खुसरो, जाहिर अहमद यांच्यासह शिक्षकवर्ग आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी शाळा प्रशासनाच्या वतीने मान्यवर पाहुण्यांचे आभार मानण्यात आले.